Advertisement
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण 128 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. शहरातील 32 प्रभागांपैकी सुमारे 17 प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी माजी नगरसेवक, सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षांचे मोठे पदाधिकारी समोरासमोर उभे ठाकले आहेत.
या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधील समीकरणे विशेष चर्चेत राहिली आहेत. या प्रभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. या युतीनुसार दोन जागांवर शिवसेनेचे तर दोन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, याच प्रभागात भारतीय जनता पक्षाला मोठा तांत्रिक फटका बसला आहे. भाजपच्या तीन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्यामुळे या ठिकाणी केवळ एकाच जागेवर कमळ हे चिन्ह मतदारांना पाहायला मिळणार आहे. यामुळे या प्रभागातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत.
प्रभागनिहाय उमेदवारांचा विचार केला तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे सुरेश म्हेत्रे, राष्ट्रवादीचे विकास साने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजय झरे यांच्यात मुख्य लढत आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये लांडगे कुटुंबातील सदस्यांमध्येच चुरस पाहायला मिळत असून तिथे भाजपचे योगेश लांडगे आणि रवी लांडगे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सिद्धार्थ बनसोडे आणि इतर मातब्बर उमेदवारांमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.पिंपरी चिंचवडच्या या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. यासोबतच काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि इतर अपक्ष उमेदवारांनीही मोठे आव्हान उभे केले आहे.
