Advertisement
सोलापूर : मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुद्द्यावरून सोलापुरातील जोशी गल्ली परिसरात भाजपच्या दोन गटांमध्ये वाद पेटला होता. याच वादातून शिंदे आणि सरवदे कुटुंब आमनेसामने आले आणि या संघर्षात मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा जीव गेला.
या घटनेनंतर मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान अमित ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सरवदे यांच्या पत्नी आणि लहान मुलींना धीर देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या घटनेबद्दल अमित ठाकरे संताप व्यक्त करतानाही दिसून आले. दरम्यान, या हत्या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरवदे याने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुलच्या तक्रारीनुसार, बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबातील काही सदस्य हातात तलवार, कोयते आणि काठ्यांसारखी शस्त्रे घेऊन शिंदे यांच्या घरात घुसले आणि मारहाण केली, असा दावा त्याने केला आहे.
