Advertisement
पुणे : बनावट वकील असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःला वकील भासवून नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप अरविंद राजाराम सूर्यवंशी उर्फ अविनाश पाटील याच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने गेल्या ७ ते ८ वर्षांपासून पुण्यातील जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर तसेच कोल्हापूर, ठाणे, सातारा, सांगली आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत असल्याचे भासवले. इतकेच नव्हे तर सिंहगड रोडवरील एका हिरो टू-व्हीलर शोरूमच्या वर वकिलांचे कार्यालय सुरू करून तो लोकांना कायदेशीर सल्ला देत असल्याचा बनाव करत होता, असा आरोप आहे.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित इसमाने “अॅड. गोपाळ जगन्नाथ भोसले” या खोट्या नावाने स्वतःला वकील म्हणून सादर केले, तर प्रत्यक्षात तो नोंदणीकृत वकील नसल्याचे समोर येत आहे. या माध्यमातून त्याने अनेक नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या इसमाविरुद्ध निगडी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर.सी.सी. क्रमांक ६९/२०१४ असा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात २०१४ साली जामिनावर सुटल्यानंतर आरोपी आणि त्याची पत्नी सौ. नंदा अरविंद सूर्यवंशी हे दोघेही फरार असल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, पती-पत्नीने मिळून स्वतःला वकील असल्याचे भासवत अनेकांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, संबंधित इसमांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
