#

Advertisement

Friday, January 2, 2026, January 02, 2026 WIB
Last Updated 2026-01-02T14:44:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात "मनसे" नेत्याचा बळी

Advertisement

भरदिवसा झालेल्या हत्येने शहरात तणाव

सोलापूर : सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या गडबडीत राजकीय वाद चिघळला आणि त्यातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुण हा मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये घडली. बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ते मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. राजकीय वादातूनच त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २ मध्ये आज अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या दोन गटांत जोरदार वाद झाला होता. या प्रभागातून शालन शिंदे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्याच बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दबाव टाकला जात होता. याच मुद्द्यावरून शिंदे गट आणि सरवदे गटात वाद इतका वाढला की भाजप नेते शंकर शिंदे यांचं कार्यालयही फोडण्यात आले. याच वादात मध्यस्थी करण्यासाठी बाळासाहेब सरवदे तिथे गेले होते, असं सांगितलं जातं. मात्र त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत  त्यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.