Advertisement
गुजरात कनेक्शन आलं समोर
नाशिक : जिल्ह्यातील विंचूर येथील शंभर वर्षे जुनी जिल्हा परिषदेची शाळाच विक्रीचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचं ही या प्रकारात समोर आलं आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व विक्री प्रकरणात गुजरात कनेक्शन ही समोर आलं आहे. शाळेच्या विक्रीसाठी गुजरात राज्यात मुक्तारपत्र तयार करण्यात आलं. या माध्यमातून विंचूर येथील शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित खरेदीदाराने शाळेच्या जागेवर सोयाबीन पिकाची लागवड केल्याची नोंद शासन दरबारी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारा विरोधात शाळेचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शाळा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही विक्री प्रक्रीया रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. संबंधित नोंद अधिकृतरीत्या रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनामुळे नाशिक- छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
