Advertisement
रोहित पवारांच्या नव्या पोस्टने मोठी खळबळ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताला 20 दिवस पूर्ण झाले आहेत, पण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) अद्याप प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही. या दिरंगाईमुळे रोहित पवार यांनी संशय व्यक्त करत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की,"स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी!
14 फेब्रुवारी रोजीही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की" अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्या. याच विषयावर गृहमंत्री अमित शाह साहेब, नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू जी तसेच DGCA ची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट होऊ शकली नाही. त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री, नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA यांना ई-मेल पाठवून या अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली आहे.
