Advertisement
नाशिक ते अक्कलकोट नवा रस्ता
नाशिक : श्री स्वामी समर्थ यांचं अक्कलकोट गाठणे भविष्यात जलद होणार आहे. कारण लवकरच नाशिक ते अक्कलकोटचा प्रवास सुसाट होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी 'नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर'च्या कामाला वेग आला आहे.
सूरत-चेन्नई मार्गात बदल करण्यात आला असून 374 किलोमीटर लांबीचा महामार्ग पुढील 2 वर्षांत पूर्ण करण्याचा ध्येय 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने' (NHAI) ठेवलंय. नाशिक जिल्ह्यातील 107 हेक्टरहून अधिक जमीन संपादनासाठी प्रशासकीय हालचालींना वेगाने सुरु झाल्या आहेत. या महामार्गामुळे बाधित शेतकरी आणि नागरिकांकडून प्रशासनाने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. शिवाय त्यासाठी 21 दिवसांची अंतिम मुदत दिली गेली आहे.. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. नाशिक ते अक्कलकोट हा महामार्गाची एकूण लांबी ही 374 किलोमीटर आहे.त्यात 152 किलोमीटर भाग 70 मीटर रुंद तर 222 किलोमीटर भाग 60 मीटर रुंद राहणार आहे. 5.6 किलोमीटरचा मार्ग दऱ्याखोऱ्यांतून जाणार आहे. तर या मार्गावर 27 मोठे पूल आणि 164 लहान पुलांचे जाळे राहणार आहे. तर हा मार्ग नाशिक (आडगाव) पासून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूरमार्गे थेट अक्कलकोटला जोडला जाणार आहेत. या महामार्गामुळे भविष्यात शेतकरी, उद्योजक आणि पर्यटकांना दक्षिण भारताशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सुरुवातीला हा मार्ग 'सूरत ते चेन्नई' असा 1200 km चा ठरवण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध आणि तांत्रिक कारणांमुळे केंद्र सरकारने यात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता हा मार्ग नाशिकच्या आडगावपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांमधील 30 गावांमधून हा महामार्गाचा प्रवास असणार आहे. नाशिक तालुक्यातील आडगाव, विंचूरगवळी तर निफाड तालुक्यातील दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपानी, तळवाले या गावांतून रस्ता जाणार आहे. तसंच सिन्नर तालुक्यातील देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी, कहांडलवाडी या गावांमधून हा रस्ता जाणार आहे.
