Advertisement
कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, राजस्थान अशी नोंद
पुणे : लग्न...सहजीवनाच्या प्रवासातील एक असा टप्पा, जो स्त्री आणि पुरुषांच्या जीवनाला एक वेगळं वळण देतो. अनेकांना अपेक्षित स्थैर्य देतो तर कैक नवे अनुभवही देतो. मात्र हेच वैवाहिक आयुष्य सर्वांसाठीच एकसारखा अनुभव देऊन जातं असं नाही. कारण, काही प्रकरणांमध्ये लग्न आनंदाऐवजी मनस्तापच अधिक देऊन जाते. महाराष्ट्रातून याच लग्न, वैवाहिक नात्यांसंदर्भातील अशी माहिती समोर आली आहे जी काहीशी अनपेक्षित ठरत आहे. कारण, वैवाहिक नात्यातील तणाव आणि त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटांमध्ये महाराष्ट्र यादीत अव्वलस्थानी आहे. महाराष्ट्रात घटस्फोटाचा दर 18.7 अर्थात सर्वाधिक आहे. त्यामागोमाग कर्नाटक 11.7 टक्के, पश्चिम बंगाल 8.2 टक्के, दिल्ली 7.7 टक्के, तामिळनाडू 7.1 टक्के, तेलंगणा 6.7 टक्के, राजस्थान 2.5 टक्के अशी नोंद आहे.
दोन कुटुंबं एकत्र येत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणे म्हणजे आयुष्यभराची साथ अशी धारणा आता मागे पडत असून, अनेक जोडपी लग्नाच्या अवघ्या काही वर्षांतच आयुष्यभराच्या आणाभाका विसरून विभक्त होण्याचा निर्णय घेत आहेत.घटस्फोटाचा दर महाराष्ट्रात इतर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं आकडेवारी सांगते. यामध्ये घटस्फोट मागणाऱ्या महिला 25 ते 34 वर्षे वयोगटातील असून 40 टक्के प्रकरणं ही लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत घटस्फोट मागण्याची आहेत. सदर निरीक्षणानुसार जानेवारी, सप्टेंबर आणि मे महिन्यात घटस्फोट घेण्यासाठी सर्वात जास्त याचिका दाखल केल्या जात असून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च महिन्यात सर्वात कमी याचिका दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, पीएलएफएस सर्व्हे (2017-24), कायदा मंत्रालय, दिल्ली हायकोर्ट, लाइव्ह लॉ, एनसीआरबी, एनएफएचएस-5 (2019-21), कौटुंबिक कोर्ट व जिल्हा न्यायालये. एडजुआ लीगल्स गुगल अॅनालिटिक्स 2025 च्या अहवालानुसार, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लखनऊ, हैदराबाद आणि कोलकात्यात घटस्फोटाची प्रकरणं तिपटीनं वाढली आहेत. घटस्फोटित महिला-पुरुषांचा कोणताही सरकारी राष्ट्रीय डेटा उपलब्ध नसला तरही देशात घटस्फोटाचं सरासरी वय महिलांमध्ये 31 वर्षे तर, तर पुरुषांमध्ये 36 वर्षे असल्याची माहिती खासगी मार्केट रिसर्च कंपन्यांच्या निरीक्षणावरून स्पष्ट होत आहे.
