#

Advertisement

Wednesday, February 11, 2026, February 11, 2026 WIB
Last Updated 2026-02-11T14:53:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अ‍ॅड. कोमलताई हरल्या नाहीत जिंकल्या !

Advertisement

लक्ष्मीदहीवडी गटात घराघरात चर्चा; भाजपच्या विजयी उमेदवार आताच दिसेनात

 मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेसाठी लक्ष्मीदहीवडी गटात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार करूणा शिवशरण विजयी झाल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढलेल्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखेे-ढोबळे यांनी या गटातील मतदारांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. खरं तर विजयी उमेदवाराने आपल्या मतदारांचे आभार मानायचे असतात. परंतु, पराभूत झाल्यानंतर अवघ्या एक-दोन तासांत अ‍ॅड. कोमलताई यांनी आपल्या गटाचा दौरा करीत मतदारांच्या घरोघरी जावून आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे काही मतदारांनी आश्रुंना वाट मोकळी करून देत अ‍ॅड. कोमलताई यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. याउलट भाजपच्या विजयी उमेदवार करूणा शिवशरण या मात्र टीका करण्यातच धन्यता मानताना दिसल्या. 

माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी लोकाग्रहास्तव जिल्हा परिषद निवडणूक लढविली. परंतु, त्यांचे नाव मतदार यादीतून काढण्यापासून त्यांना उमेदवारी मिळू नये, कोणत्याही मोठ्या नेत्याचा पाठिंबा मिळू नये, सभा होऊ नयेत याची सगळी काळजी विरोधकांनी घेतली. लक्ष्मीदहीवडी गटातून भरलेला अर्ज माघारी घेण्याकरीताही त्यांच्यावर राज्य पातळीवरून दबाव टाकण्यात आला. याच कारणास्तव काही स्थानिक नेते मंडळीनीही ऐनवेळी त्यांना अडचणी निर्माण होतील, अशी राजकीय खेळी केली. परंतु, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह दिवंगत नेते अजित पवार यांनी केलेल्या सुचनेनुसार अ‍ॅड. कोमलताई यांनी निवडणुकीत आव्हान निर्माण केले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पूर्ण प्रचार यंत्रणा खचली होती, अशाही स्थिती अ‍ॅड. कोमलताई यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उभारी दिली. प्रचाराच्या अखेरच्या चार ते पाच दिवसांत त्यांनी लक्ष्मीदहीवडी गट अक्षरश: पिंजून काढला. त्या शेतकरी मतदारांच्या शेतात, गाय-गोठ्यात रमल्या, घरातील माऊलींबरोबर बसल्या, घरकाम करू लागल्या त्यामुळे निवडणुकीसाठी कोणी तरी प्रचार करीत आहे, अशी भावना त्यांच्याबद्दल मतदारांत नव्हतीच, प्रचाराच्या अखेरच्या टप्यात तर अ‍ॅड. कोमलताई यांनी आपला विजय निश्चीतच केला होता. 

अ‍ॅड. कोमलताई यांचा झंझावात सुरू असल्याने विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागली.  भाजपच्या उमेदवार करूणा शिवशरण यांचा पराभव स्पष्ट दिसू लागलेला असताना आमदार समाधान आवताडे यांना खुद्द मैदानात उतरावे लागले. पालकमंत्री गोरे यांना विनवण्या करून त्यांच्या सभा ठेवण्यात आल्या. ज्या ठिकाणी उमेदवाराबद्दल काहीच माहिती नव्हती त्या ठिकाणी अन्य मार्गाने मत गोळा करण्यात आली. पडद्यामागील हालचाली वाढत गेल्या. सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची मदत मागण्यात आली, काँग्रेसच्या उमेदवार खडतरे यांना मोठी रसद पुरविण्यात आली, त्यामुळेच सुरवातीला दोन टेम्पोवर सुरू असलला काँग्रेसचा प्रचार नंतरच्या काळात अगदी डिजीटल ते लक्ष्मीवाटपापर्यंत गेला. या सगळ्यात अ‍ॅड. कोमलताई मात्र विकासाच्या मुद्यांवरून हटल्या नाहीत, अखेरपर्यंत त्यांनी आपल्या गटाचा सर्वांगिण विकास कसा करणार, हाच मुद्दा मतदारांना पटवून दिला. सुज्ञ 7903 मतदरांनी त्यांच्या बाजुने कौल दिला. परंतु, राजकीय सारीपाटात अ‍ॅड. कोमलताई यांचा प्रामाणिकपणा काहीसा कमी पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचीच असलेली हक्काची पाच हजार मत काँग्रेसच्या उमेदवाराने खाल्ली आणि विकासाची आच असलेला अ‍ॅड. कोमलताई यांच्या सारखा चांगला उमेदवार निवडून येता येता राहिला. भाजपच्या उमेदवार करूण शिवशरण निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे जल्लोष करण्यासाठी कार्यकर्तेही नव्हते तर दुसर्‍या बाजुला अ‍ॅड. कोमलताई यांच्या पराभवाचीही मोठ्या विजयाची एवढी चर्चा झाली आणि आजही सुरू आहे.अ‍ॅड. कोमलताई हरल्या नाहीत, त्या जिंकल्या...!