Advertisement
करूणा शिवशरण यांना आभार दौरा काढण्याच्या दिल्या सूचना
मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषदेसाठी लक्ष्मीदहीवडी गटात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार करूणा शिवशरण विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारांचे आभार मानायला हवे होते. परंतु, ना कुठला फ्लेक्स, ना कुठला दौरा. याउलट त्या सत्कार समारंभात रमलेल्या असताना तब्बल 7903 मत मिळवीत पराभूत झाल्यावरही अवघ्या एक-दोन तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आपल्या गटाचा दौरा करीत मतदारांच्या घरोघरी जावून आभार व्यक्त केले. त्यांच्या या दौर्याची केवळ मंगळवेढा मतदारसंघातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात अगदी सर्वपक्षीय वरिष्ठ पातळीवरही चर्चा झाली. सदर बाब भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी आपल्याच पक्षाच्या लक्ष्मीदहिवडी गटातून निवडून आलेल्या उमेदवार करूणा शिवशरण यांना चांगलेच फैलावर घेतले. आभार दौरा काढा, असे कडक शब्दांत आदेश दिले. त्यानंतर सत्कार समारंभाचे फोटो झळकवीत आभार दौरा केल्याचे वृत्त काही ठिकाणी झळकू लागले. याबाबत लक्ष्मीदहिवाडी गटातील काही गावात आढावा घेतला असता त्या आभार मानायला आल्याच नाहीत, असे अनेक मतदारांनी सांगितले, असा दावा विरोधकांकडूनही केला गेला. त्यामुळे लक्ष्मीदहिवडी गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या करूणा शिवशरण यांना आता आमदार म्हणल तसेच वागावे लागणार असल्याची चर्चा गटात चांगलीच रंगली आहे. भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या असल्या तरी आमदार आवताडे यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही त्यांच्यासाठी सभा घ्यावी लागली, या सगळ्या प्रयत्नातून भाजपच्या या उमेदवाराबद्दल काहीच माहिती नव्हती त्या निवडून आल्या खर्या परंतु, राजकीय कुठलेही संस्कार नसल्याने त्या सुरवातीलाच मागे पडल्या असल्याचे चित्र आहे. याउलट अॅड. कोमलताई यांच्या पराभवाचीही मोठ्या विजयाची सारखी चर्चा सुरू आहे.
