Advertisement
१७००० कोटींचा निधी आणल्याची घोषणा फसवीच
सोलापूर : जिल्हा परिषदेसाठी लक्ष्मीदहिवाडी गटासाठी आमदार समाधान आवताडे यांची प्रतिष्ठापणाला लागलेली असल्याने काहीही करून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे आपण आजपर्यंत मतदार संघासाठी हजारो कोटींचा निधी असल्याचे ते भाषणांतून जाहीरपणे सांगत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत आपण १७००० कोटींचा निधी आणल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. यावेळी त्यांनी सभेला जमविलेल्या गर्दीतून टाळ्या मिळवल्या असल्या तरी सभा संपल्यानंतर मात्र आमदारांनी एवढा निधी कधी आणला आणि तो काठे खर्च केला, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी एका सुज्ञ नागरिकाने गुगलवर सर्च केले असता अशी कोणतीही विश्वासार्ह नोंद आढळली नाही. त्यामुळे आमदारांची निधीबाबतची फेकाफेकी गुगलनेच उघड केली असल्याची चर्चा सध्या मंगळवेढ्यासह सर्व जिल्हा परिषद गटांत रंगली आहे.
आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार करूणा शिवशरण आणि पंचायत समितीच्या काही उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लक्ष्मीदहीवाडी (क्र. ५५) या गटात कोणत्या सुविधा राबविणार, काय विकास करणार हे मुद्दे बाजुला ठेवून आपण आमदार निधी किती आणला आणि अजून किती आणणार याबाबत ते जाहीरसभेत सांगत आहेत. परंतु, खरंच आमदारांना एवढा निधी मिळतो का, याची चाचपणी त्यांनी करायला हवी. परंतु, समोर बसलेली जनता दुधखुळी असल्याचे समजून ते खोट बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेत आहेत. वास्तव मात्र वेगळे आहे. त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची कामे केवळ कागदावरच आहेत तरी भाजपच भारी, असे आंधळे प्रेम आमदार आवताडे दाखवित आहेत. त्यांची हिच सवय नगरपरिषद निवडणुकीतही त्यांच्याच अंगलट आली आणि आता जिल्हा परिषदेतही त्यांची ही सवय पुन्हा अंगलट येणार, हे गुगलनेच आता सर्च केले तर उघड करून दाखविले आहे.

