Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे निवेदन
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी स्थापन केला आणि अजितदादांनी मोठ्या कष्टाने तो उभा केला, भक्कम केला. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र यावेत, अशीच दादांची इच्छा होती, त्यांच्या अखेरच्या आदेशाने आम्ही जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढलो, यातून आपल्या पक्षाची ताकद पुन्हा दिसून आली, ही बाब लक्षात घेता आदरणीय शरद पवार साहेब आणि सुनेत्रा वहिनी आपण दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यभरात पक्षीय पातळीवर होत असलेली मतमतांतरे पाहता याविषयी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पक्षाला निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात राजकीय स्थित्यंतरे होत असताना शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवली, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हेच दिसून आले. पक्ष एक राहिल्यानंतर मोठी ताकद निर्माण होऊ शकते हे अजितदादांनी दाखवून दिले. आपल्या राजकीय भाषणात दादांनी मोठे काका पवार साहेबांचा नेहमीच आदरयुक्त उल्लेख केला. विविध व्यासपीठावरही साहेब आणि दादा एकत्र दिसले, त्यांनी वेळोवेळी संवादही साधला.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षविलनीकरणाबाबत त्यांनी साहेबांशी ही चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठकही झाली, त्यानुसार पक्षविलनीकरणाचा सकारात्मक निर्णय घेण्याबाबत साहेब आणि दादांना कळविण्यात आले होते. परंतु, अघटीत घटनेमुळे पक्षावर मोठा आघात झाला. यामध्येही सुनेत्रा वहिनी यांनी भक्कमपणे आपली जबाबदारी स्वीकारली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. दादांच्या निधनानंतर पवार साहेब चिंतेत असल्याने त्यांची प्रकृती काहीशी बिघडली, आता ते स्वस्थ आहेत. परंतु, पुढील राजकीय आव्हाने पाहता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलनीकरणाचा निर्णय तातडीने होणे गरजेचे वाटते. साहेबांचे आशीर्वाद तर आहेतच तसेच सुप्रियाताई यांच्यासह पार्थ दादा, जय दादा, राहुल दादा तसेच आमच्यासारखे कार्यकर्ते आपणास भक्कम साथ देतीलच. फक्त दादांप्रमाणे तुम्ही पदाधिकारी कार्यकर्त्यांना लढ म्हणा..., एवढी अपेक्षा व्यक्त करून पक्षविलणकरणाचा निर्णय आपण तातडीने घ्यावा, अशी विनंती करते.
