#

Advertisement

Monday, February 16, 2026, February 16, 2026 WIB
Last Updated 2026-02-16T11:37:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढ्यात ढोबळे घराण्याची पुनरागमनाची रणधुमाळी !

Advertisement

मतदारसंघात ॲड. कोमल ढोबळे सक्रिय ; जनतेचा प्रतिसाद 

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात आता नव्या पर्वाची चाहूल लागली आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या, उच्चशिक्षित वकील ॲड. कोमल ढोबळे साळुंखे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत दिले आहेत. पराभवाने खचून न जाता त्यांनी थेट जनतेत उतरत भेटीगाठी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लक्ष्मी-दहिवडी गटातील पराभवानंतरही “मन पराभूत नाही” अशी भूमिका घेत कोमल ढोबळे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे तालुक्यातील सत्ताधारी गटासमोर नवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या आमदार समाधान दादा अवताडे आणि जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण यांच्या माध्यमातून विकासकामे सुरू असली तरी “राहिलेल्यांना न्याय” देण्याची जबाबदारी आपण स्वीकारणार, असा अप्रत्यक्ष संदेश कोमल ढोबळे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, “करुणा शिवचरण या शत्रू नाहीत; त्या राजकीय विरोधक आहेत,” असे सांगत त्यांनी संघर्षाऐवजी समतोल साधण्याची भूमिका मांडली आहे.
१९८५ साली मंगळवेढ्यातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले लक्ष्मणराव ढोबळे यांनी मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री अशी अनेक पदे भूषवली. २००९ मध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर त्यांनी मोहोळमधून विजय मिळवला. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काही स्वभाववैशिष्ट्ये स्पष्टवक्तेपणा, कानावर आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची सवय आणि काम करूनही त्याची मस्करीत उपेक्षा यांचा फटका बसल्याची चर्चा तालुक्यात आजही ऐकू येते.
आता ‘नवा डाव, नवे राज्य’ या भूमिकेतून कोमल ढोबळे मैदानात उतरल्या आहेत. मात्र, राजकारणात प्रत्येक वेळी संघर्षच यश देतो असे नसते. बुद्धिबळातील घोड्यासारखी अडीच घरांची अचूक चाल खेळत, संयम आणि मुत्सद्देगिरी दाखवणे तितकेच आवश्यक असते. शब्दांतील तिखटपणा कमी करून, आवाजात गोडवा आणत आणि कामात धार ठेवत जनतेचा विश्वास संपादन करणे हे त्यांच्यासमोरचे खरे आव्हान ठरणार आहे.