#

Advertisement

Thursday, February 5, 2026, February 05, 2026 WIB
Last Updated 2026-02-05T13:34:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विकासाच्या मुद्द्यावर जागरूक मतदान करण्याची हीच वेळ !

Advertisement

 

ऍड. कोमलताई ढोबळे यांनी केले आवाहन

मंगळवेढा : स्वर्गातून नरकाकडे मतदारसंघाची घसरण सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत घणाघात करत ऍड. कोमलताई ढोबळे यांनी विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्षातील वास्तव यात प्रचंड तफावत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर सडकून टीका केली.  विकासाच्या मुद्द्यावर जागरूक मतदान करण्याची हीच वेळ असल्याचा स्पष्ट करत दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही ऍड. कोमलताई ढोबळे यांनी केले. 
आंधळगाव येथे लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून व पंचायत समितीचे उमेदवार काकासाहेब मोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.  ऍड. कोमलताई ढोबळे म्हणाल्या की, ग्रामीण भागात सायंकाळच्या कामाच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीज खंडित केली जाते. दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, दूध काढण्यासाठी विजेची अत्यंत गरज असते मात्र, नेमक्या त्याच वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी व दुग्धव्यवसायिक नाराज असल्याचे चित्र आहे. या भागातील रखडलेली विकासकामे आणि भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अपेक्षित गुणवत्तेने झाले नसल्याचा आरोप करत आपण जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार असल्याचे पुनरुच्चार केला. पाणी हा राजकारणाचा नव्हे तर विकासाचा विषय आहे. आमदार साहेबांना विधानसभा निवडणुकीत लीड न मिळाल्याचा राग विविध गावात सावत्रपणे काढला जातोय का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी २१ कोटींचा निधी आजपर्यंत का दिला नाही आणि तो आत्ताच निवडणुकीच्या दरम्यान पालकमंत्र्यांना कसा सुचला, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप हे दबाव तंत्र वापरून गावागावात नेतेमंडळी विकत घेत आहे. मात्र, जनता आमच्या सोबत आहे. गावोगावी पाणीटंचाई, जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण आहेत. लोकांना फक्त आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे आहे, असे सांगत त्यांनी विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व निवडण्याचे आवाहन केले.
माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही आमदार समाधान आवताडे यांच्यावर निशाणा साधत उपसा सिंचन योजनेतील पाण्याच्या गणितावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चार टीएमसी पाणी दोन-चार एकरात कसे बसवणार? असा असा सवाल करत जनतेला खरे चित्र सांगितले जात नाही, गेल्या ३० वर्षांत आपण सत्तेत असताना साधेपणाने काम केल्याचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित मतदारांशी संवाद साधत दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी सरपंच रामचंद्र लेंडवे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, संभाजी लेंडवे, अंकुश लेंडवे, सुरेश पवार, संजय घोडके, नागेश स्वामी यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक सागर गुरव यांनी केले, सुनील वेळापुरे यांनी आभार मानले.