Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार यावर अवलंबून
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांचे नावही चर्चेत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचे स्नेही असल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील या नेत्याचे राजकीय पुनर्वसन करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. सदर नेत्यास संधी दिली गेल्यास सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण राजकीय गणित फिरणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कांग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु, राज्यसभेच्या खासदारकीसाठी सोलापुरातील या नेत्याने लॉबिॅग सुरु केली आहे.
महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2026 असा आहे.
या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 मार्च 2026 असा आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, 6 मार्च 2026 रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 मार्च 2026 आहे. निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी पूर्ण होणार आहे.
