Advertisement
मुंबई : राज्य शासनाच्या वतीनं विधीमंडळात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला मात्र आमदारांची दांडी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' हेच वाक्य आठवलं. राजधानी मुंबईतील मराठी भाषा कार्यक्रमाबाबत आमदारांची मात्र अनास्था हा चर्चेचाच विषय ठरला आहे. सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमांचं आमंत्रण असतानाही 90 टक्क्यांहून अधिक आमदार कार्यक्रमासाठी गैरहजर असल्याचं दिसून आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री यांची उपस्थिती वगळता आमदारांची अनुपस्थिती लक्ष वेधणारी होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळं आमदारांनी विधीमंडळाच्या या अधिवेशनात उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचदरम्यान विधीमंडळात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला असतानाही तिथं मात्र आमदार आणि लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळं यामागचं नेमकं कारण काय हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री ही सर्व मंडळी कार्यक्रमासाठी असतानाच आमदार नेमके कोणत्या कामामध्ये व्यग्र आहेत, ज्यामुळं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
