Advertisement
सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट अधिसभेत मुद्द्यावरून संघर्ष
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट अधिसभेत सोमवारी मानद पदव्यांच्या मुद्द्यावरून कुलगुरू आणि सदस्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला. बैठकीत पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्याचा ठराव मांडण्यात आला. यावेळी डॉ. आदटराव यांनी 2020 च्या प्रलंबित ठरावाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लिट पदवी देण्याचा ठराव पाच वर्षांपूर्वीच सिनेटमध्ये मंजूर झाला होता. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा सवाल सदस्यांनी विचारला. यावेळी कुलगुरूंनी भूतकाळात जाण्याची गरज नाही, पुढच्या वेळी विचार करू, असे उत्तर दिल्याने सभागृहात पाऊण तास जोरदार गदारोळ झाला. यावेळी शरदचंद्र पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मानद पदवी देण्याचे प्रस्ताव चर्चेत आले. विद्यापीठ प्रशासन महापुरुषांच्या सन्मानाबाबत दुजाभाव करत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.
