Advertisement
मंगळवेढा येथे सर्वपक्षीय, संघटना एकत्र येणार
मंगळवेढा : केंद्रात आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाने निवडणुकांवेळी जो जाहीरनामा सादर केला होता, त्याचा विसर सत्तेत आल्यानंतर या सरकारला पडला आहे, याची आठवण करून देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय, संघटना तहसील कार्यालयावर जाहीर महामोर्चा काढणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी, अखंडित वीज पुरवठा, घरकुलासाठी पाच ब्रास वाळू यासह अन्य आश्वासने दिली होती. मात्र, सत्ता येताच याचा विसर सरकारला पडला आहे. याच कारणातून देशभरातील, राज्यभरातील शेतकरी सातत्याने मोर्चे काढत आहेत, आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करा, आमचा सातबारा कोरा करा, अशा प्रकारची मागणी या मोर्चातून होत आहे. भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध राज्यभरात मोर्चे काढून शेतकरी नोंदवत असताना भाजप सरकारने यामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, याचीच आठवण करून देण्यासाठी आम्ही मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्व पक्षांना आमंत्रित करून आम्ही सर्वजण या मोर्चातून एकत्र निषेध नोंदवणार आहोत.
राज्यातील विविध महामंडळाला निधी, अनुदान देण्यातही हे सरकार दुजाभाव करीत आहे. चार मागासवर्गीय महामंडळ आहेत, या प्रत्येक महामंडळाचा जो निधी आहे तो एक हजार कोटीचा करावा आणि सातत्याने सर्व महामंडळांना या निधीची व्यवस्था करावी, एक महामंडळाला पन्नास टक्के आणि इतराना जास्त, असा गैरप्रकार बंद करून सर्वांना समान न्याय, सर्वांना समान हक्क देण्याबद्दल शासनाने धोरण आखावे अशा, सर्व मागण्यासाठी आम्ही मोर्चाची तारीख ठरवून शक्यतो सोमवारी मोर्चा काढणार आहोत, आमची भूमिका जाहीर करणार आहोत, असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्पष्ट केले.
राजाभाऊ चेळेकर यांनी पाठिंब्याची मांडली भूमिका
..................................
मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या वतीने आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या करिता, मोर्चा निघत आहे. या निमित्ताने मी पाठिंबा जाहीर व्यक्त करीत आहे. गल्ली ते दिल्ली, असा भाजपचा नारा, सध्या देशभर पसरत आहे. परंतु, लोकसभेला, विधानसभेला अगदी आत्ताच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केले आहे, याचा कुठेतरी जाब विचारण्याकरिता, जाहीरनाम्यात म्हटल्या प्रमाणे भाजपने कोणतीही योजना अमलात आणलेली नाही म्हणून आज हा मोर्चा ढोबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर आम्ही नेत आहोत. मी एक साधा कार्यकर्ता म्हणून या मोर्चामध्ये सामील होऊन शेतकरी, कामगार, दलित, विकासापासून वंचित असलेल्यांना न्याय देण्यासाठी ढोबळे सरांच्या सोबत उभा आहे. आज, वयाची 73 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा हा आमचा नेता आहे, आज खरोखरच त्यांचे काम वाखण्याजोगे आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मंगळवेढा शहर एक माजी पदाधिकारी म्हणून राजाभाऊ खेडेकर आणि बालाजी मित्रपरिवार, नवरंग मित्रपरिवार या सगळ्यांच्या वतीने त्यांना पाठिंबा देतो.
