Advertisement
खरातसोबत अनेकांचे फोटो : फक्त महिला म्हणून माझ्यावर आरोप
मुंबई : माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागते, काय करते याची माहिती कशी असेल? माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचं वाईट वाटतं, अशीप्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केली आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आपले जे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत, एखादा व्यक्ती पुढे जाऊन कसा वागेल याची माहिती आपल्याला कशी असेल. आपलं कुटुंब वारकरी संप्रदायाचं असल्याने अशोक खरातच्या ट्रस्टशी आपण जोडलो गेलो, परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर माहिती नव्हती. या प्रकरणात जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. यानंतर सविस्तरपणे पुराव्यासह लवकरच पत्रकार परिषद घेणार आहोत, असे चाकणकर यांनी सांगितले.
ते व्हिडीओ जुने ...
अशोक खरातच्या ट्रस्टवरील संचालकपदाचा आपला कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपला आहे. आता जो पाद्यपूजेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाच वर्षांपूर्वीचा आहे असा दावा रुपाली चाकणकरांनी केला. त्या म्हणाल्या की, खरात पती पत्नीला गुरू मानलं. त्यामुळे ट्रस्टच्या ठिकाणी काही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरू मानल्याने आम्ही संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावायचो. पाच सहा वर्षांपूर्वीचे व्हिडीओ समोर येत आहेत.
