Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (एमव्हीए) मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेसने आपल्या हक्काच्या जागेवर दावा सोडून पवारांना पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय तर्कवितर्क थांबले असून, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. एमव्हीएकडे संख्याबळानुसार एक जागा सहज मिळेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ६ मार्चपर्यंत आहे. मतदान १६ मार्चला होईल. पवारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. हे एमव्हीएच्या एकजुटीचे फलित आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील नेते सतेज पाटील यांची भेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी घेतली.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.
शरद पवार हे आमचे उमेदवार राहतील, आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांना मतदान करु असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जाहीर केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानले.
