Advertisement
रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चर्चा व्हावी, यासाठी विरोधकांकडून सातत्याने मागणी केली जात असताना अद्यापही या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होत नसल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) आमदार रोहित पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, हा मुद्दा सभागृहात येण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा घेण्याची मागणी केली आहे. अध्यक्षांनी उद्या किंवा सोमवारी चर्चा घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात काय घडते, याकडे लक्ष ठेवावे लागेल, असे त्यांनी म्हटले. या अपघाताबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या प्रकरणात ‘VSR’ कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत, यामागे “कोणीतरी मोठी व्यक्ती” असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. याच मुद्द्यावर इतर नेते, जसे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, यांनीही चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
“आमच्याकडे काही महत्त्वाची माहिती आहे. सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर ती माहिती सार्वजनिक करू,” असा इशाराही रोहित पवार यांनी दिला. सत्तेत असतानाही संबंधितांना न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
