Advertisement
द्रुतगती मार्गावर 6 नवे बोगदे
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सहा नवीन बोगदे उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 104 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. या योजनेमुळे मार्गावरील वाहतुकीची क्षमता वाढणार असून प्रवास अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे.
सध्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दररोज सुमारे 70 ते 80 हजार वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र नवीन बोगदे आणि अतिरिक्त मार्गिका तयार झाल्यानंतर ही संख्या वाढून जवळपास 1.5 लाख वाहनांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना होणारा विलंब कमी होईल. या प्रकल्पांतर्गत खंडाळा येथे 1, कामशेत येथे 2, भाटण येथे 1, आडोशी येथे 1 आणि माडप येथे 1 असे एकूण 6 बोगदे उभारण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही कायमची समस्या बनली आहे. भविष्यात शहरातील विविध रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. याचा विचार करून द्रुतगती मार्गावरील मार्गिका वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या या मार्गावर 6 लेन आहेत आणि त्यात आणखी 4 लेन वाढवण्याचा विचार सुरू आहे. सणासुदीच्या काळात तसेच सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर मोठी गर्दी होते. अशा वेळी वाहतुकीचा ताण अधिक वाढतो. त्यामुळे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढवणे आवश्यक मानले जात आहे. तसेच मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत सुमारे 20 किमी अंतरावर 8 लेनचे काम पूर्ण होणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.
