#

Advertisement

Friday, March 6, 2026, March 06, 2026 WIB
Last Updated 2026-03-06T14:15:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कर्ज फेडण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी विकली किडनी

Advertisement

सोलापूरमधील एका मध्यस्थाचा पर्दाफाश 

मुंबई : सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याची सुन्न करणारी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ही प्रकरणे प्रामुख्याने उघडकीस आली आहेत. तपासात सोलापूरमधील एका मध्यस्थाचा पर्दाफाश झाला आहे. या व्यक्तीने स्वतःची किडनी 8 लाखांना विकली आणि त्यानंतर इतर 16 जणांना या जाळ्यात ओढले. या रॅकेटमध्ये आतापर्यंत 11 आरोपी समोर आले असून, त्यातील 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
विधानसभेत नितीन राऊत आणि अतुल भातखळकर यांच्यासह अनेक आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने हे वास्तव मांडले. धक्कादायक म्हणजे, या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असून, या किडन्या थेट कंबोडियासारख्या देशांतील रुग्णालयांमध्ये विकल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
चंद्रपूरच्या नागभीडमधील रोशन कुडे या शेतकऱ्याची कहाणी काळजाचा थरकाप उडवणारी आहे. त्याने सावकाराकडून केवळ 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याज इतकं वाढलं की, सावकाराने त्याच्याकडून 48.53 लाख रुपये आणि 1 एकर जमीन घेतली. तरीही तगादा संपला नाही, अखेर या शेतकऱ्याला कर्जमुक्तीसाठी परदेशात जाऊन आपली किडनी विकावी लागली.