Advertisement
मुंबई : अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेने सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. ‘बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल तर काँग्रेस उमेदवारीबाबत विचार करेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचं बोलल्यानंतर वडेट्टीवार यांनी हे मोठे वक्तव्य केलं आहे.
..तर बारामतीमध्ये तिहेरी लढत
एकीकडे विजय वडेट्टीवारांनी बारामतीत काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले असताना, आधी बिनविरोध होण्याची चर्चा असणारी ही जागा आता तिरंगी लढतीने गाजण्याची चिन्हं आहेत. कारण याच मतदारसंघात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही शड्डू ठोकला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवला आहे.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
- अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
- अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
- मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
- मतमोजणी : 4 मे 2026
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
