Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आणखी भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले आहेत. महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक इंजिन असून 2047 च्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असेल. विकसित महाराष्ट्रचं 2047 चं उद्दीष्ट गाठण्यासाठी व्हीजन डॉक्युमेंट जाहीर करत यामध्ये संतुलित विकासाचे प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन असे 4 महत्त्वाचे स्तंभ असतील, सदर कार्यवाहीसाठी व्हीजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्य़ात येणार आहे. प्रगतीशील स्तंभाअंतर्गत कृषी, संलग्न क्षेत्र, ग्रामीण विकास, उद्योग, सेवा आणि पर्यटनावर भर दिला जाणार आहे. कृषी क्षेत्रातील अर्थव्यवस्था 9 पटींनी वाढवण्याचा मानस राज्य शासनानं ठेवला असून, शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार केली जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बोलीभाषेतील मार्गदर्शक तयार केलं जाईल. तसेच, 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याअंतर्गत सर्वसमावेशक सेवा मिळतील. तंत्रज्ञानाच्या साथीनं नव्या उपक्रमांना राज्यात चालना दिली जाणार असून, विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांमुळं शेतीच्या उत्पादन खर्चात 25 टक्क्यांची घट होण्याची शकता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना विविध कृषीयोजनांचा लाभ घेता यावा यासाठी अॅग्रीस्टॅकवर 1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. शेतीसोबतच मत्स्योत्पादन आणि पशुजन्य व्यवसायावर अधिक भर दिला जाणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांच्यावर भर देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्प्यामध्ये 27,87,000 घरकुलं मंजूर करण्यात आल्याची माहितीही देवेंद फडणवीस यांनी दिली आहे.
