Advertisement
तटकरेंना लक्ष्य करत बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेले नाराजी नाट्य आता अधिक गडद झाले आहे. पक्षात सन्मान मिळत नाही आणि योग्य सहकार्यही लाभत नाही, असा थेट आरोप करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पदाधिकारी राजीनामे देत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत पदाधिकारी बाहेर पडत असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गौतम खरात यांनी त्यांच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खरात यांनी अत्यंत परखड शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी आजवर अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम केले, मात्र प्रदेश पातळीवरून अपेक्षित मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळाले नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची मुळे 26 जानेवारी रोजी घडलेल्या घडामोडींमध्ये आहेत. सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काही सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला होता आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्या निधनामुळे आणि त्यापूर्वी झालेल्या अपघातामुळे पक्षातील सर्व गणिते बदलली. अजित पवार जोपर्यंत सक्रिय होते, तोपर्यंत त्यांनी हे राजीनामे फेटाळले होते, परंतु त्यांच्या पश्चात अवघ्या दीड महिन्यातच या पदाधिकाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे राजीनामा सत्र केवळ एका पदाधिकाऱ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. गौतम खरात यांच्या आधी राष्ट्रवादी मोटर मालक वाहतूक सेलचे सचिन जाधव, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालवणी आणि असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनीही आपले राजीनामे दिले आहेत. या सर्व नेत्यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आक्षेप नोंदवला होता. पक्षात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्या समीकरणांना महत्त्व दिले जात असल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
