Advertisement
- मंगळवेढ्यात सर्वपक्षीय धडक मोर्चा
- शेतकऱ्यांची कर्ज माफीसह सातबारा कोरा करावा
- उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन
मंगळवेढा : महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या राज्यातील आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज तत्काळ माफ करून सातबारा कोरा करावा, तसेच वीज पंपांची जुनी थकीत विले पूर्णपणे माफ करावीत. सध्या शेतकऱ्यांना मिळणारा आठ तासांचा वीजपुरवठा अपुरा असून, शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्याच्या वेळेत तत्काळ वाद करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे- ढोबळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंगळवेढा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध शेतकरी व जनतेच्या प्रश्नांसाठी सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना अॅड. साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, २०२४ व २०२५ मधील खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळाली. तूर, मका आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू करावीत, अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनीही सरकारवर टीका केली, नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आजही अनेक समस्यांशी झुंज देत आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ कागदी घोषणा करून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी
निधीअभावी कारणे दिली जातात, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच असल्याची टीका ढोबळे यांनी केली,
मंगळवेढा तालुक्यात सध्या लोडशेडिंग, चारा छावण्या, जलजीवन योजना अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या सर्व समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय घरकुल योजनेसाठी तालुक्यातील
घरधारकांना पाच ब्रास मोफत वाळूची सवलत द्यावी, भूमिहीनांना जमीन उपलब्ध करून द्यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेली निलंबनाची कारवाई अन्यायकारक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जलजीवन योजना वचारा छावण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
या मोर्चात मारुती वाकडे, मनसेचे अध्यक्ष नारायण गोवे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, पांडुरंग जावळे, पोपट पडवळे, राजाभाऊ चळेकर, काका मोरे, देवदत्त पवार, भारती चौगुले, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, आवेशा शेख, क्रांती दत्तु, दीपाली शिंदे, आपचे तालुकाध्यक्ष एकनाथ फटे, सागर गुरव, रवींद्र कांबळे, दिलीप सावंत, महादेव मुदगुल आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर प्रतिनिधीमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली.
