Advertisement
विधानपरिषदेच्या नऊ आमदारांचा निरोप समारंभ
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आजचा अधिवेशनाचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. विधानपरिषदेच्या नऊ आमदारांना निरोप देण्यात आला. या आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात संपणार असून, पुढील अधिवेशनाअगोदर नऊ विधानपरिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने आजच त्यांना अधिकृत निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहातील नेत्यांनी या आमदारांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा 'साहेब' असा उल्लेख केल्याने हा चर्चचा विषय झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा 'साहेब' असा उल्लेख करीत सर्वांची नावे वाचून दाखवली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो. त्यांना शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले. नीलमताईंमी उपसभापती म्हणून चांगले काम केले. ताईंचे काम बोलते. काल घेतलेल्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या कामाची प्रचिती आली.ताई आमच्या रणरागिणी आहेत. तुमचा स्पष्टवक्तेपणा कुणाला आवडला नसेलही. नीलमताईंना कळले की पुढचे स्टेशन आहे ठाणा. अमोल मिटकरी…बस्स ही नामही काफी है. दादांच्या निधनानंतर त्यांचे हळवे रूप पाहिले. दादा असते त्यांनी भरभरून बोलले असते. शशिकांत शिंदे व मी दोघेही साताऱ्याचे. शिंदे कभी डरते नही, मैदान छोडकर भागते नही. त्यांनी साताऱ्यातील घटनेने हे दाखवून दिले. संदीप जोशी यांना सावजी खावून कंटाळा आला असेल तर ठाण्याची मामलेदार मिसळ खायला त्यांनी यावे. आज वाईट बोलायचे नसते. काहीजण निवडणुकीच्या समोरासमोर असतील, असेही ते पुढे म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
उद्धवजी यांचा निरोप समारंभ करतोय. मतभेद असतात..सोबत असतो कधी संघर्ष करतो. पण यापलीकडे वेगळे नाते असते. आम्ही सहप्रवासी राहिलो आहोत. त्यांचा स्वभावात राजकारण कमी आहे. स्वभाव राजकारणी नाही. एकदा ठरवले की निर्णय घ्यायचा असा त्यांचा स्वभाव. ते छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. हे छायाचित्रण नव्हे तर संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. वारीचे छायाचित्र काढताना रिस्क घेवून हेलिकॅाप्टरमधून त्यांनी केले. २०१० नंतर आमची जवळीक आली. मैत्रीची भावना निर्माण झाली, आताही ती आहे. पण राजकीय भूमिका वेगळ्या झाल्यात, असे फडणवीस म्हणाले.
