Advertisement
शेकडो लोक रस्त्यावर; 3 फोटोंमुळे अडकला
मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्याने राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याचे चित्र कोकणात पाहायला मिळाले. ज्या मंत्र्याचा राजीनामा मागितला जातो आहे तो मंत्री म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वात पहिले प्रवक्ते दीपक केसरकर. खरातशी दीपक केसरकर यांची नाशिकमधील सिन्नर येथील केवळ ईशान्येश्वर महादेव मंदिरातील भेटीमुळे ओळख झाली. आता, अशोक खरातवर बलात्कार व काळ्या जादू प्रकरणांचा आरोप केला जात आहे. केसरकर आणि खरातचे एकत्र फोटो व्हायरल होऊन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
दीपक केसरकरांचे खरातसोबतचे तीन फोटो व्हायरल झाले आहेत. यापैकी पहिला फोटो हा नोव्हेंबर 2022 चा असून या फोटोत केसरकर हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटलांसोबत सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात दिसत आहेत. शिर्डीला जाताना वाटेत हे मंत्री सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात थांबले होते. गायींच्या गोशाळेसाठी देणगी व काम तपासण्यासाठी ही भेट दिल्याचं नंतर सांगण्यात आले. त्याचप्रमाणे केसरकरांचा खरातच्या मुलीच्या लग्नातील एक फोटो व्हायरल झाला असून तिसऱ्या फोटो हा खरात स्वत: ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्त्याची मागणी करण्यासाठी केसरकरांना भेटलेला तेव्हाचा आहे. हा रस्ता बांधून देण्यात आला असून यामागे केसरकर कनेक्शन असल्याचं सांगितले जाते.
विरोधकांकडून गंभीर आरोप
विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणावरुन केसरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. केसरकर खरातचे निस्सीम भक्त होते, खरातच्या सांगण्यावरून मंत्रालयात जायचे-न जायचे ठरवायचे, असे विरोधकांचं म्हणणे आहे. खरात मंत्रालयाच्या कामात केसरकरांच्या माध्यमातून हस्तक्षेप करायचे असाही आरोप केला जात आहे. यामध्ये पदोन्नती, ट्रान्सफरसारख्या गोष्टींचा समावेश होता. खरात आठवड्यात दोन दिवस केसरकरांच्या सरकारी बंगल्यावर मुक्काम करायचे, असाही आरोप केला जात आहे.
