Advertisement
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ
पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपूरमधील तीन नेत्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यामुळे पंढरपुरात पक्षाची ताकद वाढली आहे. यामुळे भाजप आमदार समाधान औताडे यांची मात्र आगामी निवडणुकीत चिंता वाढण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशावर बोलताना शिंदे म्हणाले की, जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके हे पंढरपूरात विकासाची गंगा नक्की आणतील. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असून भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे नमूद करत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे, पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. काही चॅनलवालेच डरकाळी फोडत आहेत. ती ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांमुळे आणि भगव्याच्या शानमुळेच दररोज हजारो नेते , लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत असंही शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
