#

Advertisement

Monday, April 13, 2026, April 13, 2026 WIB
Last Updated 2026-04-13T12:18:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले आमदार औताडे यांचे कौतूक ! पण...

Advertisement

सोलापुरातील बदलत्या राजकारणात आमदारांना ढोबळेंचाच आधार 

सोलापूर : सोलापुरातील राजकारणात गेल्या काही दिवसांत उलाढाली वाढलेल्या असताना राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. पंढरपुरातील तीन स्थानिक नेत्यांनी महायुतीचा घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे विद्यमान आमदार समाधान औताडे यांची चिंता वाढली आहे. त्यातच औताडे यांच्या आमदारकीच्या वाटचालीत मोठा वाटा असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आमदारांच्या आजपर्यंतच्या कामाबाबत जाहीरपणे समाधान व्यक्त करीत काैतूक केल्याने आगामी काळात औताडे यांना पुन्हा ढोबळे यांचे बोट धरावे लागणार आहे.

पंढरपूरमधील तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने पंढरपुरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. परंतु, शिवसेना पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने आगामी काळात भाजप आमदार समाधान औताडे यांना हिच मंडळी राजकीयदृष्टया अडचणीची ठरू शकतात. त्यामुळे २०२९-३०च्या विधानसभा निवडणुकीची तयारीत असलेल्या आमदार औताडे यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, त्यांच्या या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे  उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भगीरथ भालके यांचे मोठे काैतूक केले आहे. ही गोष्ट आमदार औताडे यांच्यासाठी फारशी काही चांगली ठरणारी नाही.

दरम्यान, याच कालावधीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यासपीठावर जाहीरपणे आमदार औताडे यांच्या कामाचे कौतूक केले. मागासवर्गीय समाजासाठी आमदारांचे काम मोठे आहे, असे सांगत असताना आपल्याकडे टीकात्मक गोष्टी भरपूर आहेत पण मी ते बोलणार नाही, असे लक्ष्मणराव ढोबळे यांनी उघडपणे सांगत ढोबळे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कन्या ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांचा पराभव नेमका कशामुळे झाला याची नकळतपणे आठवण करून दिली. परंतु, अशाही स्थितीत ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी कौतूक करणे ही आमदार औताडे यांच्यासाठी खरोखरच जमेची बाजू मानली जात आहे. सोलापुरातील बदलत्या राजकारणाची ही सुरूवात असल्याचेही मानले जात आहे.