Advertisement
राज्य सरकारचा आणखी एक करार : साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई : नागपुरचे प्रसिद्ध उद्योजक आणि सुप्रिया सुळे यांचे भावी जावई सारंग लखानी यांच्या नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राज्य सरकारसोबत एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. हा करार 5 हजार 760 कोटी रुपयांचा आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पार पडलेल्या या करारामुळे आता राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1 लाख मेगावॅट वीज क्षमता निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लखानी घराणे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगक्षेत्रात असून यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत अनेक प्रकल्पांसाठी भागीदारी केली आहे.
राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. हे उदंचन जलविद्युत प्रकल्प (पीएसपी) माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाद्वारे सुमारे 5 हजार 760 कोटींची गुंतवुणूक होणार असून यामधून सुमारे 1 हजार 500 लोकांना रोजगारनिर्मिती होणार आहे. या कराराअंतर्गत नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. या करारावेळी सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी, जलंसपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
