Advertisement
असा असेल मार्ग आणि किती असणार टोल
मुंबई : मुंबई - पुणे प्रवासासाठी महत्त्वाचा हा मिसिंग लिंक हा प्रकल्प महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे पासून वाहतुकीसाठी सुरू होणार आहे, असा राज्य सरकारचा निर्धार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासात 30 मिनिटांचा वेळ कमी होणार आहे. या मार्गाचं काम शेवटच्या टप्प्यात असून लोड टेस्टिंग काम सुरु आहे. मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक म्हणजेच खोपोली – कुसगाव दरम्यानच्या १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या तसंच पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे. हा प्रकल्प मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हा प्रकल्प 13.4 किमी सरळ रस्ता असणार आहे. पहिला बोगदा ओलांडल्यानंतर 650 मीटर लांबीचा एक्स्ट्रा डोस्ड केबल स्टेट ब्रिज असणार आहे. लोणावळ्याच्या खालून जाणारा बोगदा असणार आहे. या ब्रिजच्या मधोमध दिसणारा सर्वाधिक लांबीचा भाग 305 मीटर इतक्या अंतराचा असणार आहे. 170 मीटरचे पिलर तर ब्रिजचा डेक जमिनीपासून 100 मीटरच्या उंचीवर आहे. 13.4 किमी सरळ रस्त्यावर आठ लेन असल्याने वाहतूक जलद आणि सुरळीत होणार आहे. या मिसिंग लिंकवर दोन मोठे बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल असून जो अतिशय आकर्षक असणार आहे. खासकरून या मिसिंग लिंकचा प्रवास पावसाळ्यात अतिशय सुंदर असणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगदा आहे.
या मिसिंग लिंकवरून सुरुवातीला हलक्या वाहनांना प्रवासाची मुभा असणार आहे. पहिल्या 3 महिन्यांनंतर अवजड आणि प्रवासी वाहनांना टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाणार आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर वाहतुकीची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
मिसिंग लिंकचा मार्ग असा असणार :
मुंबईहून पुण्याकडे जाताना : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे / वांद्रे-वरळी सी लिंक → ठाणे → कळंबोली → एक्स्प्रेसवे → खालापूर टोल → खोपोली एक्झिट → मिसिंग लिंक (बोगदे + टायगर व्हॅली ब्रिज) → कुसगाव → पुणे
नवी मुंबईहून अटल सेतू मार्गे: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबईतील रहिवाशांना कळंबोली येथे द्रुतगती मार्गावरुन जो खालापूरच्या त्या भागाच्या अगदी जवळ आहे, तिथून 'मिसिंग लिंक' सुरू होते.
टोल किती असणार..
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरून सध्या प्रवास करताना कारला 320 रुपये टोल द्यावा लागतो. जो दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढवला जातो. पण मिसिंग लिंक सुरु झाल्यानंतर टोल दरात अचानक कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, असं प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पावर 23.5 मीटर रुंदीचा बोगदा असून तो जगातील सर्वांत रुंद बोगदा असणार आहे. यामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रयत्न करण्यात येत आहेत.
