Advertisement
मोदी सरकारला मोठा धक्का; 54 मतं पडली कमी
दिल्ली : मोदी सरकारला लोकसभेत मोठा धक्का बसला आहे. महिला आरक्षणाशी संबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झालं आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांवर लोकसभेत मतदान पार पडलं. यावेळी केवळ 298 मतं विधेयकाच्या बाजूने पडली. विधेयक नामंजूर झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की, एकूण 528 मतं नोंदवली गेली; ज्यामधील 298 मतं विधेयकाच्या बाजूने, तर 230 मतं विरोधात पडली.
मतदानाच्या पहिल्या फेरीत एकूण 489 मतं पडली होती, ज्यामध्ये 278 बाजूने आणि 211 मते विरोधात होती. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची, म्हणजेच 352 मतांची आवश्यकता होती. थोडक्यात सांगायचं झाल्यास 54 मतांनी विधेयक पडलं किंवा नामंजूर झालं आहे. दरम्यान लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान याआधी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरुन झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना या विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विरोधकांनी यावर अनेक शंका उपस्थित करत आक्षेप नोंदवले.
विधेयक मंजूर होणे शक्यच नव्हते !
हा मुद्दा महिला आरक्षणाबाबतचा नसून लोकशाहीचा होता. महिला आरक्षणाची सांगड मतदारसंघ पुनर्रचनेशी घालण्याला आम्ही कधीच संमती देऊ शकत नाही. हे विधेयक मंजूर होणे शक्यच नव्हते. आपल्या देशातील लोकशाहीचा हा एक मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधींनी दिली आहे. हाथरस, उन्नाव आणि मणिपूर येथील घटनांबाबत ज्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, तेच आता महिलाविरोधी मानसिकते'बद्दल बोलत आहेत?, अशी टीकाही विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.
