#

Advertisement

Thursday, April 23, 2026, April 23, 2026 WIB
Last Updated 2026-04-23T15:00:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांचा वारसदार कोण ?

Advertisement

2029 च्या निवडणुकांची आत्ताच चाहूल : बारामती विधानसभेसाठी तीन बंधू मैदानात

बारामती : विधानसभेच्या पोटनिवडणुकी दिवशीच पवारांच्या तिसऱ्या पिढीतील संघर्ष समोर आला. 2029 ला आपण बारामती विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असे जय पवार यांनी म्हणताच त्यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष पहायला मिळू शकतो, असे म्हणत जय पवारांना आव्हान दिले. तर या दोघांचे काका आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी दोघांनाही कानपिचक्या दिल्या. बारामतीचा राजकीय वारसा मिळवण्यासाठी जय, युगेंद्र आणि रोहित यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. 
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत भाषण करण्यासाठी सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्या आणि त्यांच्या पाठीमागे जय पवार उभे राहिले. संपूर्ण भाषणा दरम्यान जय पवार स्क्रीनवर दिसतील याची खबरदारी घेतली गेली. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आघाडी जय पवारांनीच सांभाळली होती. त्यामुळे पत्रकारांनी 2029 च्या उमेदवारीबाबत विचारलं असतां जय पवारांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. पण याच पोट निवडणूकीसाठी रोहित पवार यांनीही बारामती विधनसभेचा मतदारसंघ पिंजून काढला होता. कांकीसाठी आपण प्रचार करत असल्याचे रोहित पवार सांगत होते. मात्र, जय पवारांनी बारामतीवर दावा करताच रोहित पवारांनी 2024 च्या पवार विरुद्ध पवार संघर्षाची पुनरावृत्ती होऊ शकते असं म्हणत त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचाही दावा केला आहे. पण सत्तेच्या या खेळाचा तिसरा कोन देखील आहे. तो म्हणजे युगेंद्र पवार. 2024 ला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते देखील रिंगणात असू शकतात, अंतिम निर्णय शरद पवार घेतील असं म्हणत युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारांनी रोहित आणि जय या दोघांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. 


नव्या पिढीला भान आहे...
1967 ला शरद पवारांनी वयाच्या 27 व्या वर्षी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा जिंकली. त्यांचा वारसा पुढं चालवला तो अजित पवारांनी. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात शरद पवारांनी सत्तेची वाटणी हुशारीने केली होती. अगदी राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर देखील तुटेपर्यंत ताणायच नाही याचं भान या दोन्ही नेत्यांना होतं. मात्र, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर पवारांच्या पुढच्या पिढीला हे भान उरलंय का हा प्रश्न हा संघर्ष पाहिल्यावर पडत आहे.