Advertisement
मुंबई : भाजपनं विधानपरिषद निवडणुकीसाठी सहा नावांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रादेशिक, विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. भाजपनं साधलेल्या विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येतं आहे. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे चार आमदार निवृत्त झाले आहेत. भाजपने यावेळी संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना देखील पोटनिवडणुकीच्या जागेवर उमदेवारी देण्यात आली आहे.
