Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने केला आहे. त्यांनी ट्विट करत या भेटीसंदर्भात दावा केला आहे. दरम्यान या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान यावर काँग्रेसची काय भूमिका असणार? काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे.
दरम्यान, 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये तत्कालीन संपूर्ण शिवसेना आणि भाजप यांच्यात खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. हा भाजपसाठी मोठा सेटबॅक मानल्या जात होता. पण पुढे फडणवीसांनी मोठा डाव खेळला. अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडत महायुती सत्तेत आली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंचावर आणि अनेक मुलाखतीत फडणवीस यांच्याविषयी कोणताही आकस नसला तरी विरोधाची कारणंही स्पष्ट केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंसोबत चहा घ्यायला हरकत नसल्याचे वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिला. या दोघांमध्ये अबोला असला तरी संवादाला जागा असल्याचे दिसून आले होते.
काँग्रेसने मांडली भूमिका...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळाले. ही अफवा आहे, या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. या प्रकरणात त्याची शहानिशा झाल्याशिवाय त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
