Advertisement
नाशिक महापालिकेला ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याचा जळजळीत सवाल
नाशिक : महापालिकेकडे आदरणीय अजितदादांच्या स्मारकासाठी निधी नाही. अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी वेळ नाही, मग निधी जातो तरी कुठे ? प्रशासनाकडे कुंभमेळ्याच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी आहे, तिथे कोणत्याच तक्रार नाहीत, कोणताही अडथळा नाही. पण, जेव्हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा, पुतळ्याचा विषय येतो तेव्हा मात्र तिजोरी रिकामी कशी काय होते? हा दूजाभाव का? असा जळजळीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्ष, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी अखील मातंग समाजाच्यावतीने प्रशासनाला केला.
नाशिक येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अखील मातंग समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला, यावेळी ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी प्रशासनाला या मुद्यावर धारेवर धरले. ऍड. कोमलताई म्हणाल्या की, नाशिकच्या मातीत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारावा यासाठी दोन वर्ष विनंती कराव्या लागतात. गेल्या दोन वर्षापासून फायली धुळखात पडलेल्या आहेत. त्यानंतर शासकीय, प्रशासकीय मान्यता मिळालेली असतानाही पुतळा उभारण्यात अडचणी येत आहेत. कदाचित या सरकारला आणि प्रशासनाला आपल्या शांततेचा अर्थ आपली हतबलता वाटत असावी.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या डफावर थाप मारून मराठी माणसाला जागे केले, आपल्या लेखणीने आणि शाहिरीने आपल्या मराठी माणसाला अस्तित्त्व मिळून दिले, त्यांनी साता समुद्रापार रशियापर्यंत मराठी साहित्याचा डंका वाजवला. आज, त्यांच्याच लेकरांना पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी दोन-दोन वर्ष रस्त्यावर उतरावे लागत आहे. या सरकारला महापुरुषांचा विसर पडला आहे, घटनात्मक कामकाज ही हे सरकार मनमानी पद्धतीने करीत आहे. कुंभमेळ्याच्या नियोजित कामाला पैसे मिळतात मग महापुरुषांच्या स्मारकांनाच का ब्रेक लागतो हे सरकार महाराष्ट्राला नेमकी कोणती दिशा देण्याचे काम करते एवढाच आज आम्ही समाजबांधव प्रश्न करायला आलो असल्याचेही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
