Advertisement
मुंबई : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक सुसज्ज करण्यावर भर देऊन, पंढरपूर विकास आराखड्याच्या कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत पालखी मार्ग आणि विश्रामस्थळांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. 1303 कोटी रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यापैकी आतापर्यंत 959 कोटी रुपये खर्च झाले असून, स्वच्छतागृहे, पालखी कट्टे, हायमास्ट पोल आणि रस्ते दुरुस्तीसह बहुतांश कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली, सुविधायुक्त करण्यात यावी, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नये याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

