#

Advertisement

Wednesday, April 15, 2026, April 15, 2026 WIB
Last Updated 2026-04-15T13:50:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेनेची सर्व सुत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार

Advertisement

पक्षाच्या 'कार्याध्यक्ष' पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये येत्या काळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या 'कार्याध्यक्ष' पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पक्षाची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक जून महिन्यात नियोजित आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. याच मुहूर्तावर आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.
आदित्य ठाकरे यांची ही संभाव्य नियुक्ती शिवसेनेच्या इतिहासातील एका जुन्या घटनेची आठवण करून देणारी आहे. 2003 मध्ये महाबळेश्वर येथील अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली होती. ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळली, त्याच धर्तीवर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना पक्षाचे महत्त्वाचे अधिकार बहाल करू शकतात. उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्ष झाल्यानंतर स्वतःची नवी फळी तयार केली होती. आता आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोयीनुसार आणि भविष्यातील आव्हानांनुसार आपली 'कोअर टीम' तयार करतील, असे समजते. केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकारिणीत अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आणि नव्या फळीचा मेळ घालून पुढची दिशा ठरवण्याची ठाकरेंची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.