Advertisement
फडणवीस सरकारमध्ये कोणत्या मंत्र्यांची विकेट जाणार?
मुंबई : महायुती सरकारमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीमधील मंत्रिपदांची खांदेपालट होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळली आहे.
अर्थ खातं मिळवण्यासाठी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. राष्ट्रवादीला अर्थ खात्यावर पाणी सोडावं लागलंच तर महसूल खात्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो. त्यामुळे या चढाओढीत कोणत्या मंत्र्यांचा तोटा होऊ शकतो याची चर्चा सध्या रंगली आहे. काही मंत्र्यांकडील खाती ही काढली जावू शकतात. तर काही मंत्र्यांना बदलण्याची चर्चा ही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे.
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर फडणवीसांनी अर्थ खात्याचा भार आणि अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारीही सांभाळली. आता याच अर्थखात्यावरून महायुतीतमधील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवारांनंतर अर्थखातं भाजपकडे गेले. पण हे खातं भाजपकडे कायमस्वरुपी राहावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अर्थखातं सोडायची तयारी दाखवून बदल्यात महसूल खातं मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या खात्यावर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस स्वत:कडे अर्थ खातं कायम ठेवतील. बदल्यात राष्ट्रवादीला चंद्रशेखर बावनकुळेंचं महसूल खातं दिलं जाईल. बावनकुळेंचा सन्मान राखण्यासाठी त्यांना फडणीसांकडचं ऊर्जा खातं दिलं जाऊ शकतं. भाजप आणि राष्ट्रवादीतच अदलाबदल होणार नाही. तर शिवसेनेच्या सामाजिक न्याय आणि पर्यटन खात्यांचे मंत्रीही बदलले जाऊ शकतात. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय खातं आणि मंत्री शंभूराज देसाईंकडच्या पर्यटन खात्याची जबाबदारी इतर कुणाकडे सोपवली जाऊ शकते.
