#

Advertisement

Tuesday, May 12, 2026, May 12, 2026 WIB
Last Updated 2026-05-12T13:52:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे, पटेल यांना वगळले ?

Advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिम यादी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या यादीमध्ये पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या नावांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून ही एक 'तांत्रिक चूक' असल्याचे म्हटले आहे. 

कार्यकारिणीतील प्रमुख बदल : व्हायरल झालेल्या यादीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पवार कुटुंबातील पुढच्या पिढीला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार: पत्रात त्यांचा उल्लेख 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून करण्यात आला आहे. पार्थ पवार यांची 'जनरल सेक्रेटरी' (महासचिव) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर जय पवार यांना 'नॅशनल सेक्रेटरी' (राष्ट्रीय सचिव) म्हणून स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाला सादर केल्याचे सांगण्यात येणाऱ्या या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे गायब आहेत. यापूर्वी सुनील तटकरे यांच्यावर महासचिव पदाची जबाबदारी होती, मात्र नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यादी व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने 'X' पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची एक यादी सध्या प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मात्र, त्या यादीमध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत. या चुका लवकरच दुरुस्त करून पक्षाची अधिकृत आणि सुधारित यादी जाहीर करण्यात येईल," असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.