Advertisement
2029 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार आहेत. बैठकीचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकरच प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार आहेत. 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, प्रशांत किशोर निवडणुकीचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. पुढेचे 3 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाचे असणार आहे. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
प्रशांत किशोर हे एक प्रसिद्ध भारतीय राजकीय रणनीतिकार आणि 'जन सुराज पक्षा'चे संस्थापक आहेत. त्यांना राजकीय वर्तुळात 'पीके' म्हणूनही ओळखले जाते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी यशस्वी प्रचार मोहीम राबवल्यानंतर ते देशभरात प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, तसेच ममता बनर्जी (TMC), वाय. एस. जगन मोहन रेड्डी (YSRCP), एम. के. स्टॅलिन (DMK) आणि आम आदमी पार्टी (AAP) यांसारख्या विविध पक्षांसाठी यशस्वी निवडणूक रणनीती आखली आहे. प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघासोबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात 8 वर्षे काम केले होते.
दरम्यान, डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी कँपेनिंग राबवत होते. परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर डिझाईन बॉक्सने काम थांबवले आहे. नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिले आहे.
