#

Advertisement

Friday, May 15, 2026, May 15, 2026 WIB
Last Updated 2026-05-15T13:50:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजू शेट्टींना फरफटत नेलं, जानकरांना उचलून नेलं

Advertisement

 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान

मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातील काजू आणि आंबा उत्पादकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

या वर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं. त्यावर सरकारने त्यांना केवळ 22 हजारांची मदत जाहीर केली. त्यानंतर काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक होत त्यांनी मुंबईत आंदोलन केले. गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काजू आणि आंबा उत्पादकांच्या विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी त्या आधीच आंदोलकांची धरपकड केली. 

अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कोकणातील शेतकरी कोलमडून पडला आहे. यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु सरकारकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचमुळे त्यांनी मुंबईत आंदोलनाचा पर्याय स्वीकारल्याची माहिती आहे. दरम्यान, आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करावं असं पोलिसांनी सांगितलं. मात्र आंदोलक हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यावर ठाम होते. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला.