Advertisement
एका प्रश्नानेच साखर उद्योगात खळबळ
पुणे : दौंड तालुक्याच्या माजी आमदार स्वर्गीय उषादेवी कृष्णराव जगदाळे (पाटील) यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पत्नी प्रतिभाताईंसह जगदाळे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी उषादेवी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांशी जवळपास अर्धा तास संवाद साधला. मात्र या चर्चेदरम्यान पवार यांनी तालुक्यातील ऊस शेती, साखर कारखाने आणि गुऱ्हाळ व्यवसायाबाबत माहिती घेत असतानाच अचानक “हा बोत्रे कोण आहे?” असा सवाल उपस्थित केल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या प्रश्नानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये काही काळ शांतता पसरल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्तीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, अल्पावधीत साखर उद्योगात निर्माण झालेला प्रभाव हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. राजकीय वर्तुळात या प्रश्नाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. साखर राजकारणाची समीकरणे, नव्याने उदयास येणाऱ्या आर्थिक शक्ती आणि आगामी राजकीय हालचाली यांचा संदर्भ या प्रश्नाशी जोडला जात आहे.
बाबूराव बोत्रे पाटील कोण?
चर्चेत असलेले बाबूराव बोत्रे पाटील हे महाराष्ट्रातील उदयोन्मुख साखर उद्योजक म्हणून ओळखले जातात. बाबूराव बोत्रे पाटील हे ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असून, अल्पावधीत अनेक बंद पडलेले साखर कारखाने चालवून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला जातो. मूळचे पुणे-शिरूर परिसरातील असलेल्या बोत्रे पाटील यांचे नाव सध्या सोलापूरच्या ओंकार शुगर ग्रुपमुळे राज्यभर चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या समूहाकडून १७ हून अधिक साखर कारखाने चालवले जात असल्याची चर्चा आहे.
पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
राजकीय जाणकारांच्या मते, शरद पवार यांचा कोणताही प्रश्न हा सहजासहजी नसतो. साखर सहकार क्षेत्रातील बदलती ताकद, नव्या नेतृत्वाचा उदय आणि आर्थिक समीकरणांवर त्यांची बारीक नजर असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. दौंड तालुक्यात आता एकच चर्चा रंगली आहे. “पवारांचा हा प्रश्न केवळ कुतूहल होता की एखादा राजकीय टोला?” विशेषतः बाबूराव बोत्रे पाटील यांचे वाढते साखर साम्राज्य आणि त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, हा अप्रत्यक्ष संदेश तर नव्हता ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
