#

Advertisement

Wednesday, May 20, 2026, May 20, 2026 WIB
Last Updated 2026-05-20T18:07:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पडदा !

Advertisement

बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले 

मुंबई : वायबी चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीत यावर सविस्तर मंथन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या या महत्त्वाच्या बैठकीत केवळ राजकीय रणनीतीच नाही, तर पक्षाच्या अस्तित्वाबाबत सुरू असलेल्या अफवांवरही नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. विशेषतः पक्षाच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना या बैठकीत पूर्णविराम देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असल्याचा मुद्दा थेट नेतृत्वाकडे मांडला. पक्षाचे पॉवर सेंटर असलेल्या शरद पवार यांनी या विषयावर मौन बाळगले असले तरी, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पक्षाला स्वतःच्या बळावर अधिक मजबूत करणे आणि वाढवणे हेच आमचे सध्याचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 

दुसरीकडे, अजित पवार गटातील अस्वस्थतेचा मुद्दा या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी गटातील सुमारे 22 आमदार गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात असून ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत.  सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली गुप्त भेट आणि त्यानंतर निर्माण झालेली स्थिती यामुळे अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी या आमदारांबाबत बैठकीत कोणतीही थेट चर्चा केली नसली तरी, त्यांची ही शांतता एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.

राजकीय गणितांसोबतच पक्षाने आता जनसामान्यांच्या प्रश्नांवरही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विशेषतः देशभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.