Advertisement
पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण ही ठरले
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक देवस्थानने जाहीर केलं आहे. यात पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भवानी पेठेतच माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करण्याच येणार आहे. शिवाय परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं आहे. तशी प्रक्रिया ही सुरु झाली आहे, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.
या वर्षीचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा 8 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम आळंदीमध्ये राहील. 9 जुलै रोजी पालखी सोहळा आळंदीहुन पुण्याकडे मार्गस्थ होईल. 9 व 10 जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामी राहील. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळयाचे नियोजनावर विचारविनिमय करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते.
भवानीपेठ येथे पालखी सोहळा आल्यावर होणारी गर्दी लक्षात घेता पालखी, पालखीबरोबरील मानकरी, सेवेकरी, कर्मचारी तसेच वीणेकरी आणि दिंडीतील वारकरी यांना मंदिरात आरतीसाठी उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. वारकऱ्यांना ढकलाढकली केली जाते. त्यामुळे मंदिराचा विस्तार करणेबाबत सूचना केली होती. अशा सर्व बाबींची चर्चा या बैठकीत झाली. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी भवानीपेठेत सर्व सोई देण्याचे मान्य केले. त्यानंतर यावर्षीचा माऊलींचा मुक्का हा भवानी पेठेतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
