Advertisement
मुंबई : भाजपचे नेते आणि निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. वसंत डावखरे आजात शत्रू होते. कुठेही शत्रुत्वाची भावना नव्हती. त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे आज आपल्या पक्षात येत आहेत. प्रबोध आणि त्यांचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आले आहेत. ते उत्तम व्यावसायिक आहे. त्यांच्या जिम आहेत आणि आता ते सोबत येत आहेत. या पक्षात चांगली वागणूक मिळेल कुठेही कमी जास्त अशी वागणूक असणार नाही. ते मजबुतीने काम करतील. ज्या अडचणी असतील त्या सांगत चला, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
डावखरे यांचं गाव शिरूर तालुक्यातील हिवरे हे गाव आहे. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केलं होतं. विधान परिषद उपसभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं. डावखरे यांना मानणारा वर्ग ठाणे जिल्ह्यात आहेत. पक्षाचे संघटन प्रबोध डावखरे करतील, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
