Advertisement
मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ३० मे पूर्वी सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा राज्यात भयानक आंदोलन उभं राहील,” असा थेट इशारा देत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा करत सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत समर्थकांना संबोधित करताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.
अडीच-तीन वर्षांपासून मराठा समाज लढतोय, पण अजूनही न्याय मिळालेला नाही. ५८ लाख नोंदी सापडल्या, तरी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. सरकारला मराठा समाज मोठा झालेला पाहायचा नाही,” असा आरोप करत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना ते म्हणाले, “मराठा समाजाच्या लेकीबाळींना आरक्षण नको का? अधिकारी प्रमाणपत्रे रोखत आहेत आणि त्याला जबाबदार फडणवीसच आहेत.” तसेच, “आता आंदोलन इतकं मोठं करायचं की चारही दिशांना फक्त मराठेच दिसले पाहिजेत,” असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी प्रमाणपत्र वाटपासाठी अभियान राबवले होते, त्याच धर्तीवर फडणवीसांनीही मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. सातारा, कोल्हापूर आणि औंध संस्थानासंदर्भातील जीआर तात्काळ काढून त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
