Advertisement
कोकण विभागच अव्वल : मुलींची निकालात बाजी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकालात २.०१ टक्क्याने घट झाली. यावर्षीही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या. राज्यात कोकण विभागच निकाल अव्वल ठरला आहे. राज्यातील १७९ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळाले आहेत.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त संचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेस नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णची टक्केवारी ९२.०९ आहे. गेल्या वर्षी ९४.१० टक्के निकाल लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.०१ टक्क्याने घट झाली आहे.
या परीक्षेस एकूण २९ हजार ५०६ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ आहे. एकूण २९ हजार ५१८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९ आहे. नियमित, खासगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६ लाख १४ हजार ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार १६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.७५ आहे.
असा आहे विभागनिहाय निकाल (टक्के) : कोकण - ९७.६२, कोल्हापूर - ९५.४७, मुंबई - ९४.९७, पुणे - ९४.२४, नाशिक - ९०.५३, अमरावती - ९०.५०, नागपुर - ८९.०७, लातूर - ८८.४२, छत्रपती संभाजीनगर - ८८.४१
